बुधवार, ११ एप्रिल, २०१२


तारुण्य म्हटले, की ऊर्जा आणि काहीतरी नवे करण्याची जिद्द या गोष्टी ओघाने आल्याच. समाजातील विषमता आणि भेदभाव पाहून अशी ऊर्जा आणि संवेदनशीलता असणारे अनेक तरुण अस्वस्थ होतात. आपण काहीतरी करायलाच हवे, असे त्यांना प्रकर्षाने वाटते; पण नेमके काय करायचे, याबाबत मात्र मुळातूनच गोंधळ असतो. अशा तरुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने 2005 मध्ये प्रा. अर्जुन अप्पादुराई यांनी "राइट टू रिसर्च' या मूलभूत तत्त्वज्ञानावर "पुकार' (पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज, ऍक्‍शन अँड रिसर्च) या संस्थेची स्थापना केली. पुढे मुंबईच्या सर रतन टाटा ट्रस्टच्या आर्थिक साहाय्याने युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत 18 ते 25 वयोगटातील तरुणांना समाजातील विविध पैलूंवर संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. आपली आवड, क्षमता आणि गटचर्चेतून तरुणमंडळी संशोधनाचा विषय निश्‍चित करतात. त्याचा केंद्रबिंदू असतो मुंबई शहर, त्या शहरातले स्वतःचे आयुष्य आणि भोवतालचा परिसर! आतापर्यंत सुमारे 2000 युवकांनी गट संशोधनाच्या माध्यमातून ज्ञाननिर्मितीच्या या वेगळ्या प्रक्रियेत सहभाग घेतला असून मुंबई शहराशी संबंधित सुमारे 200 हून अधिक विषयांवर संशोधन करून त्याचे रीतसर दस्तावेजीकरण केले आहे. सध्या अनिता पाटील देशमुख या "पुकार'च्या संचालिका आहेत.
पाठ्यवृत्ती प्रकल्पाची कार्यपद्धती
दरवर्षी मुंबई शहरातील विविध महाविद्यालयांतून; तसेच कम्युनिटी सेंटर्समधून साधारण चाळीस युवकांचे गट या संशोधन प्रक्रियेत सहभागी करून घेतले जातात. त्यानंतर अडीच दिवसाच्या कार्यशाळेत या गटांना वर्षभरातील कामाच्या स्वरूपाची तपशीलवार माहिती दिली जाते. प्रत्येक गटाच्या बैठकांना प्रकल्पाचे समन्वयक महिन्यातून एकदा उपस्थित असतात; तसेच प्रत्येक गटातील एक सदस्य प्रकल्पाच्या कार्यालयात येऊन इतर सदस्यांना आपल्या प्रक्रियेविषयी माहिती सांगतात.
साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात तरुणांचे गट एकाचवेळी कामाला सुरवात करतात. एकीकडे परस्परांशी ओळख वाढवत असतानाच दुसरीकडे कोणत्या विषयावर संशोधन करायचे याविषयी चर्चा करून त्यात स्पष्टता आणली जाते. सुरवातीला जो ढोबळ विषय चर्चेला घेतला जातो त्यावर चर्चा, वादविवाद या माध्यमातून तीन महिन्यांच्या कालावधीत बरीच स्पष्टता आणली जाते. अनेक गटांनी जून महिन्यात ठरविलेला विषय सप्टेंबरपर्यंत पूर्ण बदललेला असतो. बहुसंख्य गटांचे जूनमध्ये शिक्षण, संस्कृती, लैंगिकता, आरोग्य, प्रसारमाध्यमे, पर्यावरण अशाप्रकारचे एखादे ढोबळ विषयसूत्र ठरलेले असते. त्याला आपल्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ देऊन टोकदार बनवण्याचे काम पहिल्या तीन महिन्यांत केले जाते. संशोधनाचा विषय पक्का करण्याच्या कामाला "संशोधन पद्धती' या कार्यशाळेत अंतिम स्वरूप मिळते.

संशोधन पद्धतींची ओळख
या कार्यशाळेची सुरवातच प्रत्येक गटाच्या प्रश्‍नाला स्पष्ट रूप देण्याने होते. मग अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांत विविध संशोधन पद्धतींची ओळख करून दिली जाते. आपापल्या विषयाला अनुरूप अशा किमान दोन पद्धती प्रत्येक गटाने निवडायच्या असतात. एकाच पद्धतीमुळे एकांगी माहिती मिळून चुकीचा निष्कर्ष निघू नये यासाठीची ही खबरदारी असते. संशोधन पद्धतीची निवड झाली, की छायाचित्रण, नकाशा काढणे, मुलाखती घेणे, प्रश्‍नावली बनवणे अशा माहिती गोळा करण्याच्या विविध कौशल्यांची माहिती करून दिली जाते. नव्यानेच शिकलेली ही कौशल्ये प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन आजमावून पाहणे हे सर्वांसाठी अतिशय औत्सुक्‍याचे बनलेले असते.
कामाला सुरवात केल्यानंतर समाजाच्या विविध स्तरातील घटकांशी या तरुणांचा जवळून संपर्क होऊ लागतो. मग आपल्या विषयाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी योग्य तेच प्रश्‍न विचारण्याचे तंत्र ही मंडळी विकसित करायला लागतात. अमुक परिस्थितीत अमुक एखाद्या व्यक्तीशी कसा संवाद साधायचा आणि त्याच्याकडून नेमकेपणाने माहिती कशी मिळवायची हे कौशल्य त्यांना भविष्यात अनेकठिकाणी उपयोगी पडणारे असते. वास्तविक एखादा प्रश्‍न नेमकेपणाने कसा मांडायचा किंवा तो कसा विचारायचा हे महत्त्वाचे कौशल्य आजच्या शिक्षणपद्धतीत कुठेच शिकवले जात नाही. मात्र या प्रकल्पाच्या निमित्ताने तरुणमंडळी हे कौशल्य फक्त शिकत नाहीत तर ते आत्मसातसुद्धा करतात. अर्थात पुस्तकातून फक्त तयार उत्तरे मिळविण्याची आणि त्याची घोकंपट्टी करायची सवय पडलेल्या मुलांना त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. काहीजण वरवरचे प्रश्‍न विचारून हे काम "उरकण्याचा' प्रयत्न करतात. अशावेळी स्वतःच ठरवलेल्या विषयात खोलवर बुडी मारून स्वतःच्या कल्पना, विश्‍वास आणि अंधविश्‍वास यांनाही प्रश्‍न विचारण्याचे कष्ट घेण्याची आठवण त्यांना करून दिली जाते. संशोधक, कॅटॅलिस्ट आणि आता समन्वयक बनलेल्या कपिल चव्हाण, पल्लवी शिंदे यांच्याकडून या मंडळींना अशावेळी मोठा मानसिक व बौद्धिक आधार मिळतो.
युवा पाठ्यवृत्तीच्या संचालिका वंदना खरे इथे एक अनुभव नमूद करतात, ""गेल्यावर्षी एक गट "मुंबईतील देवालयात केले जाणारे नवस' या विषयावर संशोधन करीत होता. हे सर्व युवा संशोधक नव्यानेच पत्रकारितेच्या क्षेत्रात उमेदवारी करू लागले होते. इतका रसपूर्ण विषय निवडलेला असूनही दुर्दैवाने या गटाने संशोधन सुरू करण्यापूर्वीच "सध्याच्या तरुणांमध्ये अंधश्रद्धा वाढलेली आहे' असा ढोबळ निष्कर्ष काढला. त्यावेळी त्यांच्यापैकी प्रत्येकाला देव या संकल्पनेविषयी विचार मांडून पाहायला आणि धार्मिकता, नवस बोलला जाणे यामागची मानसिकता स्वतःपुरती तपासून पाहायला सांगितली. असा मूलभूत विचार जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात कागदावर उतरून काढला तेव्हा त्यांच्या संशोधनाच्या दर्जात लक्षणीय फरक पडला.''

संशोधनाचे वेगळेपण
"पुकार'च्या युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाअंतर्गत केल्या जाणाऱ्या संशोधनाचे एक वेगळेपण इथे आवर्जून नमूद करण्यासारखे आहे; ते म्हणजे ज्या विषयावर संशोधन करायचे तो विषय, ज्या लोकांकडून माहिती मिळवायची ते लोक आणि प्रत्यक्ष संशोधन करणारे संशोधक यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जातो. यामुळे संशोधनासाठी लागणारी कौशल्ये थेट युवा संशोधकांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोचतात. जी माहिती गोळा करण्याच्या टप्प्यावर विविध कारणांसाठी संवाद साधण्याचा आत्मविश्‍वास संशोधकांना मिळवून देतात. समाजातील इतर घटकांशी देवाणघेवाण वाढविण्यासाठी गटांनी वस्तीपातळीवरील कार्यक्रम करावेत याकडे लक्ष पुरवले जाते. ज्या गटांच्या विषयात साधर्म्य आहे असे 2-3 गट एकत्र येऊनदेखील असे कार्यक्रम करतात. यामुळे संशोधक गटांची परस्परांकडून शिकण्याची प्रक्रियादेखील वेग घेते.
तरुणांनी ज्ञानाची निर्मिती करताना एकमेकांकडून शिकणे याला प्रकल्पात विशेष महत्त्व आहे. स्वतःच्या जगण्याचा संदर्भ घेऊन सुरू केलेले ज्ञानाच्या उभारणीचे काम गटातील व्यक्तींचे आयुष्य व त्यांचे संदर्भ एकत्र करते. मग तिने निवडलेल्या परिसराचा संदर्भ तिला मिळतो आणि प्रकल्पातील इतर संशोधकांच्या कामाचाही संदर्भ त्याच्याशी जोडला जातो. अशाप्रकारे विस्तारत जाणारे हे वर्तुळ या छोट्याशा परिसरातील संशोधनाला अर्थपूर्ण बनवत जाते.
गुणात्मक संशोधनात विश्‍लेषणाचा विचार अगदी शेवटच्या टप्प्यावर करून चालत नाही; तर तो विचार संशोधन प्रक्रियेत सतत पार्श्‍वभूमीवर असावा लागतो. याचे भान ठेवूनच प्रत्यक्षात विश्‍लेषण करताना माहितीचा डोंगर संशोधकांच्या अंगावर कोसळू नये यासाठी एक विश्‍लेषणपूर्व कार्यशाळा घेतली जाते. यात माहिती गोळा करण्याचा टप्पा संपताना मिळालेली माहिती संगतवार कशी मांडून ठेवायची आणि त्यातून उलगडणारे विषयाचे अनेकविध पैलू कसे ओळखायचे हे नेमकेपणाने सांगितले जाते. यामुळे अचूक निष्कर्षाप्रत पोचणे सोपे जाते.
युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाचा मुख्य भर हा संशोधनाच्या प्रक्रियेवर असल्याने त्यात सर्वांना काम करण्याची व स्वतःची कौशल्ये वाढविण्याची समान संधी दिली जाते. अर्थात याहीपेक्षा गटातील सहभाग हाच निकष केंद्रस्थानी ठेवून गुणवत्तापूर्ण कामावर भर दिला जातो.

नोंदींतून मूल्यमापन
संशोधन प्रकल्प पूर्ण करत असतानाच गटातील प्रत्येक सदस्य स्वतःची माहिती, ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टिकोन यात वर्षभराच्या काळात घडलेल्या बदलांची नोंद करत असतो. त्यांच्या या नोंदीच त्यांच्या प्रकल्पाचे मूल्यमापन करतात. युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाचे हे एक ठळक वैशिष्ट्य. या प्रकल्पात शिकणारी व्यक्तीच आपण काय शिकायचे, किती शिकायचे, कोणत्या परिसरात आणि कोणत्या पद्धतीने शिकायचे, कोणते प्रश्‍न विचारायचे अन्‌ उत्तरे कशी मिळवायची हे ठरवते. यात प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक नसतात, तसेच पास-नापास अशी विभागणीही नसते. "चुका करा आणि चुकांमधून शिका' हे इथले तत्त्व आहे. त्यामुळे ज्यांनी वर्षभर या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे ते सर्वच पास झालेले असतात.
या युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पात दरवर्षी 85 टक्के गट संशोधन प्रश्‍नाच्या निवडीपासून ते आपले संशोधन सोपेपणाने समजावून सांगणाऱ्या पुस्तिका, पोस्टर्स, ध्वनिफीत किंवा चित्रफीत बनवण्यापर्यंत आपापली संशोधनप्रक्रिया वर्षभराच्या कालावधीत पूर्ण करतात. त्यातून समोर आलेले वास्तव प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले जाते. ही माहिती मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये सादर केली जाते. प्रत्येक गटाला केलेल्या कामाबद्दल प्रशस्तिपत्रक दिले जाते.
युवा पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून युवा संशोधक घडवणे एवढ्यावरच "पुकार'चे काम संपत नाही; तर युवा पाठ्यवृत्तीअंतर्गत केलेल्या संशोधनावर प्रत्यक्ष कृती करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी तरुणांना "अशोका व्हेंचर', "प्रवाह', "अनलिमिटेड इंडिया' अशा स्वयंसेवी संस्थांशी जोडून देत त्यांच्या संशोधनाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला जातो.
"पुकार'च्या संशोधन चळवळीत सहभागी झालेल्या काही तरुणांनी त्यांच्या निष्कर्षातून निघालेल्या मुद्‌द्‌यावर समाजात प्रक्रिया घडवून आणणारे विविध प्रकल्पसुद्धा सुरू केले आहेत. उदा. जोगेश्‍वरीच्या इस्माईल आणि त्याच्या गटाने "आगाज' नावाची संस्था सुरू केली आहे. संदीप येवले एसआरए आणि पुनर्विकासाच्या प्रश्‍नावर कार्यरत आहेत; तर निकिता केतकर "मासूम'ची स्थापना करून रात्रशाळेत शिकणाऱ्या मुलांबरोबर काम करते आहे आणि राम जनागमने, संपूर्ण मुंबईत "सायकल चलाओ'चा संदेश देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे.

"पुकार'चे वेगळेपण
याचप्रकारे रेल्वे परिसरात काम करणाऱ्या "अंध फेरीवाल्यांच्या जीवनकहाण्या' या विषयावरील संशोधनांचे फलित "पुकार'च्या कामाचे वेगळेपण स्पष्ट करणारे आहे. हर्षद जाधव याच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध उपनगरांत राहणाऱ्या दृष्टिहीन मित्रमैत्रिणींच्या गटाने अंध व्यक्तींमधील सर्वांत तळाच्या गटात असणाऱ्या फेरीवाल्यांच्या जीवनाचा अभ्यास केला, तर त्यांच्या समस्यांना जास्त चांगल्या प्रकारे भिडता येईल असा विचार करून रेल्वे परिसरात विक्रेते म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनक्रमाचा अभ्यास केला. सर्वच संशोधक अंध असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर ध्वनीच्या माध्यमातून काम करण्याचे बंधन होते. स्वतःचे काम ध्वनिफितींवरून डोळस लोकांना समजेल अशा लिपीत लिहून काढणे ही या गटासमोरची अडचण त्यांनी आपल्या डोळस मित्रांच्या साहाय्याने स्वतःच सोडवली. संशोधनादरम्यान या गटाने "अंध फेरीवाला हक्क परिषद' आयोजित केली होती. त्यावेळी घडून आलेल्या चर्चेचा परिणाम होऊन रेल्वे प्रशासनाने सर्व स्थानकांवरील पोलिस स्टेशनांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली. त्यानुसार अंध फेरीवाल्यांना सहानुभूतिपूर्वक वागणूक देण्यात यावी अशी विनंती रेल्वे पोलिसांना करण्यात आलेली आहे.
संशोधनाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामांमध्ये "पुकार'चे प्रतिबिंब पडते आहे, त्याची ही काही उदाहरणे.
आज "मुंबई' महानगरी जगभरातील सर्वांच्या अतिशय कुतूहलाचा विषय बनली आहे. त्यामुळे विद्वानांपासून ते पत्रकारांपर्यंत आणि चित्रपट दिग्दर्शकांपासून ते संशोधनोत्सुक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपर्यंत अनेकजण या शहरात काहीतरी शिकायला, शोधायला येत असतात. शहरी जीवनाचा अनुभव घेणारे युवा नागरिक आणि विशिष्ट कारणासाठी शहरांबद्दल संशोधन करणारी व्यावसायिक मंडळी यांची संशोधनावर आधारित एक चांगली संगत "पुकार'च्या माध्यमातून जमून येत आहे. या संगतीमुळे मुंबईवरील संशोधन हळूहळू धारदार बनते आहे.
आज "पुकार'चे काम हे मुंबई आणि परिसरापुरते मर्यादित असले तरी संस्थेच्या युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाची संकल्पना समजून घेत असे काम जागोजागी सुरू झाले तर समाजाच्या त्याचबरोबर तरुणांच्या एकूण जडणघडणीत खूपच विधायक परिणाम घडून येऊ शकेल.